कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचा पुढाकार; ८ जून रोजी कुणकेश्वर येथे कार्यक्रम
देवगड, दि. ७ जून
केंद्र शासनाच्या ‘निक्षय मित्र’ (टीबी मुक्त भारत) अभियानांतर्गत देवगड तालुक्यातील क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी मोफत धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून सोमवार, ८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी तालुका आरोग्य कार्यालय, देवगड तसेच जिल्हा क्षयरोग कार्यालय, सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित ढवळे, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक सुहास कांबळे, मिठबांव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल मेस्त्री व डॉ. मेहुल जाधव तसेच कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
क्षयरोगमुक्त समाजाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात असून तालुक्यातील संबंधित क्षयरुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.