सभापती गणेश राणे यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश; नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश
देवगड,दि.०३ ऑगस्ट
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे व गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत मोकाट गुरांचा प्रश्न, तालुकास्तरीय गोशाळा, स्मार्ट मीटर तसेच अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी मोकाट गुरांमुळे तालुक्यातील रस्त्यांवर वाढणारे अपघात, शेतीचे होणारे नुकसान आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर सखोल चर्चा झाली. सभापती गणेश राणे यांनी उपस्थित सरपंचांकडून गावनिहाय समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले .
यावेळी अनेक सरपंचांनी प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात स्वतंत्र कोंडवाडा उभारणे व्यवहार्य नसल्याचे सांगत तालुक्यातील तीन ते चार ठिकाणी सामायिक गोशाळा उभारण्याचा प्रस्ताव मांडला. यावर सभापती गणेश राणे व पशुधन विकास अधिकारी डॉ. माधव घोगरे यांनी गोशाळा उभारणीची संकल्पना, शासनाच्या योजना आणि आवश्यक कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तालुकास्तरावर योग्य जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी गोशाळा उभारण्याबाबत बैठकीत एकमत झाले.मोकाट गुरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी व शाश्वत उपाय म्हणून ग्रामपंचायत स्तरावर तसेच तालुकास्तरावर नियोजनबद्ध गोशाळा उभारणे हा प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
बापर्डेचे सरपंच संजय लाड यांनी शासनाकडून गोशाळेसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध झाल्यास पहिला प्रस्ताव बापर्डे ग्रामपंचायतीकडून पाठविण्याची तयारी दर्शविली. या चर्चेत सरपंच यांनीही विविध सूचना व मते मांडली.
यानंतर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विषयावर गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी शासनाची स्पष्ट भूमिका मांडली. देवगड तालुक्यात अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असल्याबाबत शासनाकडून कोणतेही अधिकृत पत्र प्राप्त झालेले नसल्याने त्या विरोधात विशेष ग्रामसभा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
स्मार्ट मीटरसंदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता छाया परब व कनिष्ठ अभियंता संतोष मर्गज यांनी मीटरची कार्यपद्धती, फायदे व नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. देवगड तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित मीटर संबंधित घरमालकांशी संवाद साधून व त्यांच्या संमतीनेच बसविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.स्मार्ट मीटरवरील चर्चेत सरपंच यांनी आपली मते व सूचना मांडल्या.
बैठकीच्या समारोपात सभापती गणेश राणे म्हणाले की, पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार ही संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली असून मोकाट गुरांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रशासन, पशुधन विभाग आणि ग्रामपंचायती यांच्या समन्वयातून सर्व गावांतील तसेच बाहेरून आलेल्या मोकाट गुरांचे सर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतर संबंधित मोकाट गुरमालकांवर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच तालुकास्तरावर गोशाळा उभारून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.अणुऊर्जा प्रकल्पाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसताना अफवा पसरवू नयेत किंवा विशेष ग्रामसभा घेऊ नयेत, असे आवाहन त्यांनी पुन्हा केले. तसेच स्मार्ट मीटरबाबत शासनाच्या निकषांचे पालन करून, ग्राहकांशी संवाद साधत आणि संबंधित सरपंच व ग्रामपंचायतींशी समन्वय राखूनच कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
या बैठकीस व्यासपीठावर सभापती गणेश राणे, गटविकास अधिकारी निलेश जगताप, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, पशुधन विकास अधिकारी डॉ. माधव घोगरे, कृषी अधिकारी दिगंबर खराडे, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) तुषार हळदणकर, विस्तार अधिकारी (कृषी) जोशी, स्वीय सहाय्यक दिपक मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते