स.पोलीस निरीक्षक संजय कांतिवले यांनी केले जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन
आचरा,दि. ३१ ऑक्टोबर(अर्जुन बापर्डेकर)
डिजिटल अरेस्ट हा अटक करण्याचा कोणताच प्रकार अस्तित्वात नाही. फोन करणारे लोक समोरच्या व्यक्तीला घाबरवण्यासाठी तसे सांगतात. हा केवळ पैसे उकळण्याचा प्रकार आहे. पोलीस खात्यातील किंवा सी.बी.आय.चा अधिकारी बोलतोय असे सांगून लोकांची फसवणूक केली जाते. यातून फक्त आर्थिक फसवणूक केली जात असल्याने सर्वांनी जागृक राहून याला बळी पडू नका असे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे स. पोलीस निरीक्षक संजय कांतिवले यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरा पंचक्रोशी च्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम नुकताच न्यू इंग्लिश स्कूल, आचरा येथे संपन्न झाला.
यावेळी कांतिवले यांनी सायबर गुन्हे कसे होतात व ज्येष्ठ नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, असे फ्रॉड करणारे लोक भारताच्या उत्तरेकडील भागात आहेत, तिथून असे फोन येतात. हा प्रकार अलिकडे सर्रास सुरू आहे. पण तसा फोन आला तर अजिबात न घाबरता फोन कट करा आणि तो नंबर ताबडतोब ब्लॉक करा.

या कार्यक्रमाच्या औचित्यावर ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी स.पोलीस निरीक्षक संजय कांतिवले यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष अशोक धोंडू कांबळी हे होते. आभार महिला आघाडी प्रमुख श्रीमती मनाली फाटक यांनी मानले, तर सूत्रसंचालन सचिव जे. एम. फर्नांडिस यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी संजय कांतिवले, अध्यक्ष अशोक कांबळी, उपाध्यक्ष सुरेश रामचंद्र गांबकर, मार्गदर्शक श्री. बाबाजी गोपाळ भिसले, महिला आघाडी प्रमुख श्रीमती मनाली फाटक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला संघाचे ७२ सभासद उपस्थित होते.