ठाकरे शिवसेना महिला आघाडीकडून नगरपालिकेच्या कारभाराची पोलखोल
मालवण,दि. ३१ ऑक्टोबर
मालवण बंदर जेटी येथे पर्यटक व नागरिकांच्या सुविधेसाठी असलेल्या नगरपालिकेच्या स्वच्छता गृहाची उबाठा शिवसेनेच्या महिला आघाडीने पाहणी करत स्वच्छतागृहाच्या दुरावस्थेचा स्पॉट पंचनामा करतानाच नगरपालिकेच्या कारभाराची पोलखोल केली. स्वच्छ सुंदर शहर बनविण्याचा गाजावाजा करणाऱ्या नगरपालिकेला बंदर जेटी येथील स्वच्छतागृहाची दुरावस्था दिसत नाही का ? असा सवाल उबाठा शिवसेनेच्या महिला उपशहरप्रमुख सौ. गौरी सावंत यांनी विचारला आहे. या स्वच्छता गृहाची वेळीच दुरुस्ती करून पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून न दिल्यास उबाठा शिवसेना महिला आघाडीकडून योग्य ते पाऊल उचलण्यात येईल, असा इशारा सौ. गौरी सावंत व माजी नगरसेविका पूजा करलकर यांनी दिला आहे.
मालवण बंदर जेटी येथे असलेल्या स्टॉलधारक महिलांच्या मागणीनुसार उबाठा शिवसेनेच्या महिला आघाडीने बंदर जेटी येथील नगरपालिकेच्या स्वच्छतागृहाची पाहणी केली. यावेळी माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर, सौ. दीपा शिंदे, महिला शहरसंघटक सौ. राधिका मोंडकर, उपशहरप्रमुख गौरी सावंत आदी उपस्थित होत्या.

या पाहणीमध्ये स्वच्छता गृहात पाण्याची सोय नसल्याचे, नळांना पाणी नसल्याचे तसेच महिला व पुरुष अशा दोन्ही स्वच्छता गृहमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे या स्वच्छतागृहाचे स्लॅब मोठ्या प्रमाणात कोसळलेले असून ते धोकादायक स्थितीत आहे. तसेच मीटरची अवस्था दयनीय आहे, असे गौरी सावंत यांनी सांगत स्लॅब कोसळून जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार ? असा सवालही गौरी सावंत यांनी केला आहे
स्वच्छता गृहाची दयनीय अवस्था झाली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तेथे पाय ठेवण्यासारखी परिस्थिती नाहीय. स्वच्छता गृहासाठी पाणी सर्वात महत्वाचे असताना स्वच्छतागृहाच्या नळाना एक थेंबही पाणी नाही ही शोकांतिका आहे. या परिसरात अनेक स्टॉलधारक महिला आहेत. स्टॉल धारकांकडून करवसुली केली जाते मात्र आवश्यक सुविधा येथे दिली जात नाही. मालवण एक पर्यटन शहर असल्याने नगरपालिकेने स्वच्छता गृहांमध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच त्यांची दुरुस्ती देखभाल करावी, अशी मागणी यावेळी माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर आणि महिला शहरसंघटक सौ राधिका मोंडकर यांनी करत स्वच्छता गृहांची स्थिती न सुधारल्यास आम्ही योग्य ते पाऊल उचलू, असा इशारा करलकर – मोंडकर द्वयीनी दिला आहे .