मुख्यकार्यकारी अधिकारी कोल्हापुर डॉ .जॅसमिन यांनी केले कौतुक
देवगड,दि. १२ जून
देवगड तालुक्यातील किंजवडे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण कामगिरी करत तालुकास्तरावर विशेष छाप पाडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा मूल्यांकन समितीने नुकतीच ग्रामपंचायत किंजवडे येथे भेट देऊन विविध विकासकामे व उपक्रमांची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांचे समिती सदस्यांनी कौतुक केले.
किंजवडे गावाने यापूर्वी माझी वसुंधरा 4.0 अभियान ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, आदीशक्ती अभियानात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच यशाची परंपरा कायम राखत आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातही गावाने दमदार कामगिरी नोंदविली आहे. सरपंच संतोष किंजवडेकर , उपसरपंच विनय पाडावे व ग्रामपंचायत अधिकारी हनुमंत तेरसे तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने विविध नाविन्यपूर्ण व लोकसहभागातून राबविलेल्या उपक्रमांमुळे जिल्हास्तरावर प्रमुख दावेदार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीच्या पाहणीवेळी ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजासह स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन, ग्रामविकास, लोकसहभाग आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायतीने केलेल्या नियोजनबद्ध कामकाजाबद्दल समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
या मूल्यांकन समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर डॉ. जॅसमिन मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) कोल्हापुर जयवंत उगले, जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे , विस्तार अधिकारी ( ग्रI .प ), संदेश भोईटे ,विस्तार अधिकारी ( ग्रI .प ) रविंद्र कुंभार , ग्रामपंचायत अधिकारी सचिन शिदरवाडे, ग्रामपंचायत अधिकारी शुभम राऊत यांचा समावेश होता. समितीने विविध उपक्रमांना भेट देत ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी पंचायत समिती देवगडचे गटविकास अधिकारी निलेश जगताप, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) तुषार हळदणकर, विस्तार अधिकारी समीर होडावडेकर, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती देवगड कर्मचारी , तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी,आरोग्य कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, बचत गट सीआरपी, आशा सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांत किंजवडे देऊळवाडीतील कु . राज्ञी विवेक कुळकर्णी हिने १०मध्ये १०० टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी कोल्हापुर डॉ .जॅसलिन यांनी अभिनंदन केले .
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचे आदर्श मॉडेल उभे करण्याच्या दिशेने किंजवडे ग्रामपंचायतीने केलेली वाटचाल निश्चितच इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.