देवगड : मिठमुंबरी समुद्रात बेपत्ता तरुणाचा मृतदेह अखेर सापडला; २४ तासांनंतर शोधमोहीम संपली

शेअर करा

कांदळवन परिसरात उपड्या अवस्थेत मृतदेह आढळला; स्थानिक मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे शोधाला यश

देवगड,दि. २५ मे

देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बौद्धवाडी समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पाच मित्रांपैकी समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर तब्बल २४ तासांनंतर सापडला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.
सोमवारी सायंकाळी सुमारे ५.५० वाजण्याच्या सुमारास मिठमुंबरी कांदळवन बौद्धवाडी परिसरात सदर युवकाचा मृतदेह उपड्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक मच्छीमार लक्ष्मण तारी यांचे चिरंजीव मयुरेश तारी हे कांदळवन सफारीसाठी गेले असता त्यांना मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती स्थानिकांना दिल्यानंतर मच्छीमार रमेश तारी, मत्स्यव्यवसाय सुरक्षा रक्षक इंद्रदिप येरम, सरपंच बाळकृष्ण गावकर, पोलीस पाटील दयानंद मुंबरकर यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.
या शोध मोहिमेत तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, मच्छीमार व स्थानिक ग्रामस्थ सक्रिय सहभागी झाले होते. मत्स्य विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने समुद्रकिनारी विविध भागांत शोधमोहीम राबविण्यात आली होती.
दरम्यान, घटनेच्या वेळी स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे तिघा तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते. तर एका तरुणाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. मात्र एक तरुण समुद्रात बेपत्ता झाला होता.
अखेर सुमारे २४ तासांच्या अथक शोधानंतर मृतदेह सापडला असून नातेवाईकांनी त्याची ओळख पटवली. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे मिठमुंबरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा