Sindhudurg news : सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात देशात प्रथम क्रमांकावर – भवानी शंकर

शेअर करा

ओरोस येथे प्राथमिक विकास संस्थांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांवर चर्चासत्र ; जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांचे कौतुक

सिंधुदुर्ग,दि.२७ऑक्टोंबर
संस्था संगणकीकरणाचा महाराष्ट्र राज्याचा रिपोर्ट पाहता टी-1 प्रकारात २१४ पैकी २०९ संस्था म्हणजेच ९८ टक्के कामकाज पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांकावर येण्याचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. इतर राज्यांचा विचार करता ९८ टक्के कामकाज देशभरात कोणत्याही राज्यात झाले नसल्याने देशातही पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याबद्दल जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,जिल्हा बँक उपाध्यक्ष,सर्व संचालक तसेच संस्थांचे चेअरमन, सचिव,जिल्हा बँकेतील अधिकारी,कर्मचारी आणि अभिनंदनास पात्र आहेत,असे गौरवोद्वार राष्ट्रीय बँक पुणे विभाग मुख्यसरव्यवस्थापक डॉ.ए.व्ही.भवानी शंकर यांनी काढले.
ओरोस येथील पत्रकार भवनमध्ये केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, कार्यकारी संचालक दिलीप दिघे, बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राष्ट्रीय बँकेचे उपसरव्यवस्थापक अविनाश तिवारी, नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक दिपाली माळी, जिल्हा बँकेचे संचालक नीता राणे, रविंद्र मडगांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बँक अधिकारी प्रमोद गावडे, वसंत हडकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक संस्थांचे चेअरमन, सचिव, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक संस्था संगणकीकरणाच्या कामात उल्लेखनीय काम केल्याबद्दल बँक अधिकारी व्ही. डी. हडकर, नाना कुलकर्णी, केशव आचरेकर यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.भवानी शंकर पुढे म्हणाले,संस्था संगणकीकरणा बरोबरच यापुढील काळात संस्थांना कोअर बँकिंग प्रणाली लागू होणार आहे.यापुढील काळात संस्थांना अनेक व्यवसाय करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पोटनियम दुरुस्ती, संस्था संगणकीकरण आणि देशातील सर्व संस्थांची एकाच प्रकारची संगणक प्रणाली निर्माण केली आहे.
विद्याधर अनास्कर म्हणाले, जिल्हा बँक सहकारी संस्थांसाठी विविध योजना सवलतीच्या व्याजदराने राबवित आहे. त्याचप्रमाणे संस्था सभासदांसाठी बँकेकडील थेट कर्जाच्या व्याजदरापेक्षा १ टक्का कमी दराने कर्ज उपलब्ध करून देत आहे. ही बाब सहकाराच्या वाढीसाठी भूषणावह आहे. जिल्हा बँक १ टक्का कमी दराने कर्ज संस्थांना देईल, त्याच दराने महाराष्ट्र राज्य बँकेकडून जिल्हा बँकेला रिफायनान्स करण्यात येईल.

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, २१४ पैकी २०९ संस्था म्हणजेच ९८ टक्के कामकाज पूर्ण झाले आहे.जिल्हा बँकेने मागील पाच वर्षांत प्राथमिक विकास संस्थांसाठी विविध प्रकारे आर्थिक सहाय्य केले आहे. सचिवांच्या पगारासाठी तूट भरपाई, संगणकीकरण कामकाज पूर्ण करणाऱ्या सचिवांना प्रोत्साहनपर रक्कम, सचिवांसाठी मेडिक्लेम पॉलिसी, संस्थांसाठी व्यवस्थापन खर्च, संगणकीकरण कामकाजात सहकार्य अशा विविध प्रकारे संस्थांना आर्थिक सहकार्य जिल्हा बँकेकडून करण्यात आले आहे.जिल्हा देखरेख संघामार्फत सचिव यंत्रणा नियुक्तीची कार्यवाही सुरु आहे. पुढील काळात किमान १५० गटसचिव नियुक्त करून संस्थांचे कामकाज अधिक चांगल्याप्रकारे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

शेअर करा