देवगड : मिठमुंबरी समुद्रात मुंबईतील तरुण बुडून बेपत्ता; शोधकार्य सुरू

शेअर करा

मित्रांसमवेत समुद्रस्नानासाठी गेला होता; माहिती मिळाल्यास देवगड पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन

देवगड,दि.२५ मे

देवगड तालुक्यातील मिठमुंबरी समुद्रकिनारी समुद्रस्नानासाठी गेलेल्या मुंबईतील एका २१ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. चैतन्य राजेंद्र गुरव (वय २१, रा. नायगाव-दादर, मुंबई) असे बेपत्ता तरुणाचे नाव असून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य गुरव हा दि. २४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मित्रांसमवेत मिठमुंबरी समुद्रकिनारी आंघोळीसाठी गेला होता. यावेळी समुद्राच्या खोल पाण्यात तो बुडून बेपत्ता झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिक आणि यंत्रणांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
देवगड पोलीस ठाण्यात नापत्ता रजिस्टर क्रमांक १४/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. संबंधित तरुणाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास देवगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नापत्ता तरुणाचे वर्णन :
बांधा : मध्यम
उंची : सुमारे ६ फूट
रंग : गोरा
चेहरा : उभट
पेहराव : अंगात शर्ट नसून काळ्या रंगाची हाफ पँट
संपर्क :
9860356777
7875671585
8411986115

शेअर करा