मालवण ,दि.०५ जुन
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि विविध कोरगांवकर दिग्दर्शित ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट आज प्रदर्शीत झाला असून या चित्रपटात मालवण मधील अनेक कलाकार झळकले आहेत. मालवणमधील सिने-नाट्य अभिनेत्री सौ. नमिता गावकर यांच्यासह मकरंद मयेकर, चारुहास पांजरी, रीना मराळ, जान्हवी मयेकर, प्रणाली कासले, सुजाता शेलटकर आणि रुपेश नेवगी या स्थानिक कलाकारांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवली असून मालवणचे कलाकार मोठ्या पडद्यावर झळकल्याने मालवण वासियांकडून या कलाकारांबद्दल कौतुक व अभिमान व्यक्त होत आहे.
आज प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाडची मंजुळा’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या निमित्ताने कोकणच्या मातीतील कला, अभिनय आणि सांस्कृतिक वारसा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटाची कथा आणि लेखन ऋषिकेश तुरई यांनी केले असून निर्मिती उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली आहे. हा चित्रपट रहस्य, विनोद आणि भय यांचा अनोखा संगम असल्याचे ट्रेलरमधून दिसून आले आहे. सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, ओम भूतकर, उषा नाडकर्णी, मकरंद अनासपुरे यांसारख्या दमदार कलाकारांचा या चित्रपटात सहभाग आहे.
मालवणातील कलाकारांची लक्षणीय उपस्थिती हे या चित्रपटाचे विशेष आकर्षण आहे. या चित्रपटात मालवण तालुक्यातील अनेक स्थानिक कलावंतांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट केवळ मराठी प्रेक्षकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे. अनेक मराठी चित्रपटात, टीव्ही सिरीयल आणि नाटकांमध्ये अभिनय केलेल्या तारकर्ली येथील सौ. नमिता गावकर यांनी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तसेच मालवण मधील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या अभिनयाची छाप सोडणारे तसेच सध्याच्या रिल्सच्या दुनियेत आपल्या अनोख्या कंटेन्ट व अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारे वायरी येथील मकरंद मयेकर, विरण येथील चारुहास पांजरी, मालवण देऊळवाडा येथील रीना मराळ, वायरी येथील सौ. जान्हवी मयेकर, तसेच पोईप येथील प्रणाली कासले, दांडी येथील सुजाता शेलटकर, मालवणमधील रांगोळीकार तथा रंगभूषाकार रुपेश नेवगी या स्थानिक कलाकारांनी या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. अनेक वर्षे रंगभूमी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक कलाक्षेत्रात सक्रिय असलेल्या या कलाकारांना आता मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे.
मालवणच्या कलावंतांचा सहभाग असल्याने सध्या मालवणात या चित्रपटाचे बॅनर विविध ठिकाणी लागले असून आपल्या गावातील, आपल्या मातीत वाढलेल्या कलाकारांना रुपेरी पडद्यावर पाहताना मालवण वासियांना अभिमान वाटत आहे. मालवणातील कलाकारांची ही उपस्थिती केवळ वैयक्तिक यश नसून कोकणातील कलागुणांची दखल घेतली जात असल्याचेही द्योतक आहे. मुंबई-पुण्याच्या चित्रपटविश्वात ग्रामीण भागातील कलाकारांना संधी मिळणे हे आजही आव्हानात्मक मानले जाते. अशा परिस्थितीत मालवणच्या कलाकारांनी ‘तुंबाडची मंजुळा’सारख्या मोठ्या चित्रपटात स्थान मिळवणे ही उल्लेखनीय बाब आहे. तुंबाडची मंजुळा’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर कोकणातील नवोदित आणि होतकरू कलाकारांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.