सर्वसाधारण सभेतील नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाची हालचाल; नागरिकांकडून समाधान व्यक्त
देवगड,दि.११ जुलै
देवगड-जामसंडे शहरात विनापरवानगी उभारण्यात आलेल्या फलकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. विशेषतः शहरातील धोकादायक वळणांवर लावण्यात आलेले मोठमोठे फलक वाहनचालकांच्या दृष्टीआड येत असल्याने अपघातांचा धोका वाढल्याचे नागरिकांकडून वारंवार निदर्शनास आणून देण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांनी बेकायदेशीर फलकांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शहरातील विनापरवानगी फलकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी एकमुखाने केली होती.
या मागणीची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने आता शहरातील बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेले फलक हटविण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. शहरातील विविध भागांत लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर व फलक हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
शहरातील रस्ते अधिक सुरक्षित व्हावेत, वाहतुकीस अडथळा ठरणारे तसेच नियमबाह्य फलक कायमस्वरूपी हटवावेत आणि भविष्यात अशा प्रकारे विनापरवानगी फलक उभारणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नगरपंचायत प्रशासनाने सुरू केलेली ही कारवाई सातत्याने सुरू राहिल्यास शहराचे विद्रूपीकरण थांबण्याबरोबरच वाहतूक सुरक्षित होण्यासही मोठी मदत होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.