Devgad news:बागवाडी जेटी अखेर बंद; बंदर विभागाची कारवाई

शेअर करा

कायाकिंग बोटिंग व्यवसाय आणि स्थानिक मच्छीमारांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जेटीवर प्रवेशबंदीचा फलक

देवगड,दि.२७ऑक्टोंबर

देवगड तालुक्यातील बागवाडी जेटी येथे कायाकिंग बोटिंग व्यवसाय आणि स्थानिक मच्छीमार यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या बंदर विभागाने अखेर जेटी बंद करण्याची कारवाई केली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जेटीवर कोणालाही प्रवेश करू नये, अशा आशयाचा फलक लावून जेटीवरील प्रवेश बंद करण्यात आला.

देवगडचे बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर आणि सहाय्यक बंदर निरीक्षक सुभाष गुरव यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले यांच्यासह पोलीस कर्मचारी आशिष कदम, अनिल कुमार पवार, मनोज राऊत, रवींद्र महाले आदी उपस्थित होते.

कायाकिंग बोटिंग प्रकल्प आणि स्थानिक मच्छीमार यांच्यातील वादामुळे बागवाडी जेटीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर बंदर विभागाने जेटीवरील प्रवेश बंद केल्याने या प्रकरणाला आता कोणते वळण मिळते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा