Devgad news : बागवाडी कयाकिंग प्रकल्प वादाला नवे वळण; दोन दिवसांत गुन्हे दाखल करा, अन्यथा जेलभरो आंदोलन!

शेअर करा

मिठमुंबरीतील ग्रामस्थ व पारंपरिक मच्छीमारांचा पोलीस प्रशासनाला इशारा; निवेदनाद्वारे केली कारवाईची मागणी

देवगड,दि.२७ऑक्टोंबर

देवगड तालुक्यातील बागवाडी येथे कयाकिंग प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांना धमकावल्याचा आरोप करत संबंधित बाहेरील व्यक्तींविरुद्ध चौकशी करून कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी मिठमुंबरी येथील ग्रामस्थ व स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे. यासंदर्भात देवगड पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, दोन दिवसांत संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, बागवाडी येथील कयाकिंग प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांना धमकावल्याच्या प्रकाराबाबत यापूर्वीही पोलीस प्रशासनाशी चर्चा करण्यात आली होती. मात्र, चर्चा होऊनही गुन्हे दाखल करण्याबाबत विलंब होत असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.

संबंधित व्यक्तींविरुद्ध दोन दिवसांच्या आत गुन्हे दाखल न झाल्यास परिसरातील सर्व मच्छीमार बांधव, ग्रामस्थ आणि समाजबांधवांना एकत्र करून जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे बागवाडी येथील कयाकिंग प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादात आता जेलभरो आंदोलनाचा इशारा दिल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

या निवेदनावर मिठमुंबरी येथील ग्रामस्थ व स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने भूमिका मांडण्यात आली आहे.

शेअर करा