शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने; विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
देवगड,दि.२२ जुलै
नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा निषेध तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देवगड तालुक्याच्या वतीने गुरुवार, दि. २३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता तहसीलदार कार्यालयासमोर निषेध आंदोलन व निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आवाज उठविणे, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी करणे आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात भूमिका मांडणे हा या आंदोलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या आंदोलनात देवगड तालुक्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, शिक्षण व्यवस्थेचा अवमान सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका व्यक्त करत लोकशाही पद्धतीने निषेध नोंदविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या आंदोलनाचे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देवगड तालुका प्रमुख रवींद्र जोगाल, युवासेना तालुका प्रमुख गणेश गावंकर आणि महिला तालुका प्रमुख हर्षा ठाकूर यांनी केले आहे.