देवगड : कोकण हापूस संकटावर श्वेतपत्रिका जाहीर करा; सुराज्य अभियानाची मागणी

शेअर करा

कीटकनाशकांच्या शिफारशींची स्वतंत्र चौकशी, दोषींवर कारवाई आणि वैज्ञानिक धोरण राबविण्याची मागणी

देवगड,दि.११ जुलै
कोकणातील हापूस आंबा उत्पादनासमोरील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सुराज्य अभियानाने राज्य शासनाकडे तातडीने श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे आंबा पिकासाठी अधिकृत ‘लेबल क्लेम’ नसलेल्या काही कीटकनाशकांच्या शिफारशी करण्यात आल्याचा दावा अभियानाने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अभियानाचे सिंधुदुर्ग समन्वयक डॉ. रविकांत नारकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी त्यांनी सांगितले की, कोकण हापूसच्या गुणवत्तेवर आणि निर्यातीवर परिणाम होणार नाही, यासाठी संशोधन, कीटकनाशकांच्या शिफारशी, कृषी मार्गदर्शक साहित्य आणि तांत्रिक निर्णयांचे वैज्ञानिक व कायदेशीर निकषांनुसार पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. तसेच संशोधन संस्थांमधील रिक्त पदे तातडीने भरून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईऐवजी कायमस्वरूपी वैज्ञानिक संरक्षण देणारे धोरण राबवावे, अशीही मागणी त्यांनी केली.
यासोबतच केवळ केंद्रीय कीटकनाशक मंडळ (CIBRC) मान्यताप्राप्त व वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित कीटकनाशकांच्याच वापराला प्राधान्य द्यावे, तसेच कोकण हापूसची जागतिक प्रतिष्ठा आणि निर्यात अबाधित राहण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन सुराज्य अभियानाच्या वतीने करण्यात आले.

शेअर करा