वरचीवाडी ग्रामस्थांची एकजूट; सोशल मीडियावर बदनामीचा प्रयत्न केल्याचा आरोप, पुन्हा अशी चूक न करण्याचे आश्वासन
बातमी
देवगड, दि.२२ जुलै
कुणकेश्वर येथील वरचीवाडी परिसरात अवैध वाळू वाहतूक आणि विक्रीच्या प्रकारावरून ग्रामस्थांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेत संबंधित व्यावसायिकांना जाब विचारला. यावेळी संबंधितांनी झालेल्या प्रकाराबद्दल ग्रामस्थांची माफी मागत भविष्यात खोट्या तक्रारी करणार नसल्याचे तसेच कोणत्याही प्रकारचा चुकीचा व्यवसाय करणार नसल्याचे मान्य केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
काही दिवसांपूर्वी वरचीवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन वाळू भरत असताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर संबंधित वाहन शासनाच्या ताब्यात देत कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले होते.
या कारवाईनंतर संबंधित अवैध वाळू व्यवसायिकांनी गावातील घरगुती वापरासाठी अत्यल्प प्रमाणात वाळू घेऊन जाणाऱ्या काही स्थानिक ग्रामस्थांना अडवून त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वरचीवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन संबंधित व्यावसायिकांना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत ग्रामस्थांची माफी मागितली. भविष्यात खोट्या तक्रारी करणार नाही तसेच अवैध व चुकीच्या पद्धतीने वाळू व्यवसायही करणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.