दोडामार्ग , दि. २७ जुलै
दोडामार्ग तालुक्यात तिलारी खोऱ्यासह तालुक्यातील बहुतांश गांवात वन्य हत्ती, गवे, रानडुक्कर, माकडे, केलडी, शेकरू आणि सालिंदर यांच्या वाढत्या उपद्रवामुळे केळी, नारळ, सुपारी, माणगा बांबू यांसह अन्य शेती व बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शासनाच्या विविध कृषी योजनांमुळे आणि शेतकऱ्यांनी स्वीकारलेल्या व्यावसायिक शेतीच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तालुक्यात शेती क्षेत्रात वाढ होत असतानाच या वन्यप्राण्यांच्या सातत्याने होणाऱ्या नुकसानी हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
नारळ, सुपारी, काजू यांसारख्या दीर्घकालीन बागायती पिकांसह अलीकडील काळात केळी आणि मानगा बांबू लागवडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वर्षानुवर्षे कष्ट, मेहनत आणि खर्च करून उभ्या केलेल्या बागायती काही क्षणांत वन्यप्राण्यांकडून उद्ध्वस्त होत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू वाहतात. विशेषतः पाच ते सात -आठ वर्षे जीवापाड मेहनत घेऊन जोपासल्यानंतर उत्पादन देऊ लागलेली फळझाडे नष्ट झाल्यानंतर बळीराजा मानसिकदृष्ट्याही खचून जातो.
अशा परिस्थितीत शासनाकडून देण्यात येणारी पीक नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. अपेक्षेइतकी भरपाई मिळत नसली तरी बियाणे, खते, औषधे आणि मेहनतीचा काही प्रमाणात मोबदला मिळत असल्याने शेतकरी पुन्हा नव्या आशेने शेतीकडे वळताना दिसत आहेत.