देवगड : दहीहंडी फोडताना लोखंडी खांब वाकला; मोठा अनर्थ टळला

शेअर करा

सातव्या थरावर सलामी देताना बालगोविंदाचा तोल गेला; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

देवगड,दि.०५ सप्टेंबर

‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात आणि डीजेच्या तालावर देवगड तालुक्यात ठिकठिकाणी गोकुळाष्टमीचा उत्साह पाहायला मिळत असतानाच, इंद्रधनु देवगडच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात थरारक प्रसंग घडला. दिर्बा रामेश्वर आझादनगर येथील गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर रचत असताना सातव्या थरावर सलामी देत असताना एका बालगोविंदाचा अचानक तोल गेला.

दहीहंडी बांधण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या लोखंडी खांबावरील दोरखंडाला बालगोविंदा लटकला. त्याचा भार पडल्याने लोखंडी खांब मध्यभागातूनच वाकला आणि त्याचवेळी थरावर थर रचलेले गोविंदा पथक खाली कोसळले. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये काही काळ एकच गोंधळ उडाला.

मात्र, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाही लोखंडी खांब कोणाच्याही अंगावर न पडल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही गोविंदाला किंवा उपस्थित नागरिकाला दुखापत झाली नाही. त्यामुळे ‘दैव बलवत्तर’ म्हणत उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, घटना घडल्यानंतर इंद्रधनु देवगडच्या कार्यकर्त्यांनी परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवत दुसऱ्या ठिकाणी दहीहंडी उभारली. आलेल्या गोविंदा पथकांना पुन्हा दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे काही वेळापूर्वीच्या थरारक प्रसंगानंतर पुन्हा एकदा परिसरात ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने आणि जल्लोषाने वातावरण दुमदुमून गेले.

शेअर करा