कणकवली :शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक मुकेश पवार यांना ‘गुरुसेवा सन्मान पुरस्कार’

शेअर करा

कणकवली,दि.०५ सप्टेंबर

शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रदान करण्यात येणारा ‘वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ यंदाही जाहीर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील प्रत्येकी एका शिक्षकाची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

कणकवली तालुक्यातून शिवडाव हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक तथा इंग्रजी विषयाचे अध्यापक मुकेश पवार यांची यंदाच्या ‘गुरुसेवा सन्मान पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे शांत, संयमी आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून पवार यांची ओळख आहे.

सर्वांशी सहकार्याची भावना ठेवून काम करताना आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा जपणारे शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने ५ सप्टेंबर रोजी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ग्रंथभेट असे आहे. माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

मुकेश पवार यांच्या या सन्मानाबद्दल शिक्षण क्षेत्रातून तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा