Kankavli : कणकवलीत भाजपच्यावतीने ३ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘दिवाळी बाजार’

शेअर करा

महिला बचतगट उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भाजपचा पुढाकार;महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंच्या विक्रीसाठी उपक्रम

कणकवली,दि.१९ ऑक्टोंबर

महिलांनी स्वबळावर तयार केलेल्या विविध दर्जेदार उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळावी आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने कणकवली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही दिवाळीचे औचित्य साधून ३ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी बाजार पटवर्धन चौक येथे भरविण्यात येणार अशी माहिती शहराध्यक्ष अण्णा कोदे,नगरसेविका मेघा गांगण यांनी दिली.

यावेळी नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे, संजय कामतेकर,स्वप्नील राणे, नगरसेविका प्रतिक्षा सावंत, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, साक्षी वाळके, प्राची कर्पे, प्रियाली कोदे, आस्मा बागवान, बुथ अध्यक्ष नंदू वाळके, सखाराम राणे, अमोल रासम, मिथून ठाणेकर, उदय यादव, आनंद हुमरसकर इत्यादी उपस्थित होते.

या बाजारात बचतगटासाठी २५ स्टॉल आणि कुंभार समाजासाठी १० स्टॉल उपलब्ध केले जाणार आहेत. महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. पणत्या, मेणबत्त्या, रांगोळी, दिवाळी फराळ तसेच कुंभार समाजातील कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तू नागरिकांना खरेदीसाठी उपलब्ध असतील. स्थानिक उत्पादकांना आपल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक परिसरात, आझाद मेडिकलसमोरील जागेत या दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी या बाजाराला भेट देऊन विविध स्टॉलवरील वस्तूंची खरेदी करावी आणि स्थानिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मेघा गांगण यांनी केले .

स्टॉलसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी

दिवाळी बाजारात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला बचतगट प्रतिनिधी तसेच कुंभार समाजातील व्यावसायिकांनी ३० ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन शहराध्यक्ष अण्णा कोदे,नगरसेविका मेघा गांगण यांनी केले आहे.

शेअर करा