वंचित राहिलेल्यांनी १४ जूनपूर्वी संपर्क साधण्याचे आवाहन ;कोणतेही कुटुंब या प्रक्रियेपासून वंचित राहू नये
कणकवली,दि. १२ जून
भारत सरकारच्या जनगणना अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये घरगणना व जनगणनेचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावोगावी भेट देऊन प्रत्येक घराची माहिती संकलित केली असून हे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असल्याची माहिती कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.
तालुक्यात काही कारणास्तव एखाद्या कुटुंबाची किंवा घराची घरगणना झालेली नसेल अथवा कोणतीही माहिती नोंदविणे राहून गेले असेल, तर अशा नागरिकांनी तात्काळ पुढाकार घेऊन आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित तलाठी कार्यालय किंवा कणकवली तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यासाठी नागरिकांना दिनांक १४ जून २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत आवश्यक माहिती व कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात भेट देऊन आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी. जनगणना ही शासनाच्या विविध विकास योजना, निधी वाटप व धोरणात्मक निर्णयांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने कोणतेही कुटुंब या प्रक्रियेपासून वंचित राहू नये.ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी सहकार्य करून जनगणना प्रक्रियेची अचूकता व पूर्णता सुनिश्चित करावी, असे आवाहन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.