कणकवली,दि.०५ जुन
किर्लोस कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग व आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने शिवडाव येथे सन २०२६-२७ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात ‘अल निनो’ परिस्थितीशी संबंधित कृषी उपाययोजना तसेच खतांचा संतुलित वापर याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ भास्कर काजरेकर, एटीएम विनायक पाटील, उप कृषी अधिकारी श्रीमती प्रभू, सहाय्यक कृषी अधिकारी जान्हवी चव्हाण, सरपंच श्री. भिसे , नैसर्गिक गटाचे अध्यक्ष तांबे साहेब तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी भास्कर काजरेकर यांनी अल निनोच्या पार्श्वभूमीवर पिकांवर होणाऱ्या परिणामांची माहिती देत शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी संतुलित खतांचा वापर करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. याशिवाय ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहितीही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
उप कृषी अधिकारी श्रीमती प्रभू यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, अनुदान व लाभांविषयी सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.