कणकवली : घावनळे येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता ग्राहक मेळावा

शेअर करा

कणकवली ,दि. २० ऑगस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा तुळसुली यांच्या कार्यक्षेत्रातील घावनळे येथे ग्रामपंचायत सभागृहात आर्थिक व डिजिटल साक्षरतेच्या अनुषंगाने ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास महिला खातेदारांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमास भारतीय रिझर्व्ह बँकेच्या जिल्हा समन्वयक श्रीमती बेनझीर शेख, नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापक दिपाली माळी, जिल्हा अग्रणी बँकेचे महाप्रबंधक ऋषिकेश गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावडे, उमेदचे प्रतिनिधी गणेश राठोड यांच्यासह घावनळे ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती वारंग, उपसरपंच दिनेश वारंग आणि बहुसंख्य महिला खातेदार उपस्थित होते.

यावेळी जिल्हा बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावडे यांनी बँकेच्या विविध ठेव योजना तसेच कर्ज योजनांची माहिती उपस्थितांना दिली. नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापक दिपाली माळी यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना तसेच अटल पेन्शन योजनेबाबत मार्गदर्शन केले. तसेच बँकेच्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा सुरक्षितपणे वापर करण्याबाबत माहिती देण्यात आली.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या जिल्हा समन्वयक बेनझीर शेख यांनी सध्या वाढत असलेल्या डिजिटल फसवणुकीच्या प्रकारांबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी, गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणे आणि फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.

ग्राहकांनी बँकेच्या विविध योजना व शासनाच्या आर्थिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा तसेच डिजिटल व्यवहारांमध्ये अधिकाधिक जागरूक राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा बँकेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शेअर करा