कणकवली,दि.१२ जुलै
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे रविवारी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास एक फॉर्च्यूनर कार चालकाचा ताबा सुटल्याने तब्बल २०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, फोंडाघाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने कार रस्त्यालगतच्या दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच कणकवली पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या अपघाताची कणकवली पोलिस ठाण्यात अधिकृत नोंद झालेली नव्हती. त्यामुळे वाहनातील प्रवासी, अपघाताचे नेमके कारण आणि इतर तपशील समजू शकले नव्हते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.