कणकवलीत ७ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

शेअर करा

कणकवली तालुका व्यापारी संघ व महिला व्यावसायिक संघटनेच्यावतीने आयोजन; आयुष्यमान व आभा कार्डही मिळणार

कणकवली,दि.०५ ऑगस्ट

कणकवली तालुका व्यापारी संघ व महिला व्यावसायिक संघटना, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत मोफत सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, माजी अध्यक्ष प्रसाद पारकर तसेच उपजिल्हा रुग्णालय, कणकवलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या शिबिरात नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड व आभा (ABHA) कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या विविध तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर व महिला व्यावसायिक संघटना, कणकवलीच्या अध्यक्षा संजना काकडे यांनी केले आहे.

शेअर करा