कणकवली : कणकवली बाजारपेठेत कपड्याच्या दुकानाला भीषण आग

शेअर करा

मध्यरात्री लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान; परिसरात एकच खळबळ

कणकवली,दि.२५ मे

कणकवली बाजारपेठेत रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या निवासस्थानाजवळच असणाऱ्या महाडिक लेडीज टेलर या कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली.त्यामुळे या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती समजताच अनेक युवकांनी व नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. धुराचे लोट संपूर्ण वरती छतापर्यंत वाढत जात होते. तसेच आजूबाजूला दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण अखेर युवा वर्ग व नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी देखील घटनास्थळी पोहोचत मदत कार्य केले. ही आग लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिक व्यक्त करत होते.
कणकवली नगरपंचायतीचा अग्निशामक बंब तत्परतेने घटनास्थळी दाखल झाला होता. या घटनेमुळे बाजारपेठेत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या मे महिन्याचा हंगाम असल्याने महाडिक लेडीज टेलर्स या दुकानात मोठ्या प्रमाणात महिलांचे ड्रेस, साड्या, दप्तर, छत्री, रेनकोट, शिलाई मशीन असे साहित्य विक्रीसाठी आणण्यात आले होते. हे सर्व साहित्य या आगीत जळून खाक झाले आहे. तसेच फर्निचर, वायरिंग ,इंटेरियर या सर्व वस्तूंचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे दुकान मालक प्रसाद महाडिक यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा समजू शकणार आहे.

शेअर करा