‘संदीप चौकेकर यांच्यासारखे सामाजिक भान जपणारे कार्यकर्ते प्रत्येक गावात निर्माण व्हावेत’; ग्रामीण विकासातील कार्याचे केले कौतुक
कणकवली, दि. १८ ऑक्टोबर
कणकवली तालुक्यातील शिरवल येथे संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नवदुर्गा मातेचे दर्शन घेतले. यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या हस्ते भगवी शाल व श्रीफळ देऊन संदेश पारकर यांचा सन्मान करण्यात आला. या भेटीदरम्यान संदेश पारकर यांनी संदीप चौकेकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, ‘संदीप चौकेकर यांच्यासारखे सामाजिक भान जपणारे कार्यकर्ते प्रत्येक गावात निर्माण व्हावेत,’ अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिरवल येथे आयोजित नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीचे दर्शन घेतल्यानंतर संदेश पारकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. संदीप चौकेकर हे कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने विविध सामाजिक आणि क्रीडाविषयक उपक्रम राबवत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. काही महिन्यांपूर्वी गावात आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद हा ग्रामीण भागातील युवकांच्या सहभागाचा आणि क्रीडाप्रेमाचा उत्तम नमुना असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देवीच्या उपासनेतून समाजाच्या प्रगतीची प्रेरणा

नवरात्रोत्सवाचे महत्त्व विशद करताना संदेश पारकर यांनी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवीच्या तीन रूपांचा उल्लेख केला. महाकालीचे रूप दुर्गुणांचा नाश करण्याची, महालक्ष्मीचे रूप समृद्धीची, तर महासरस्वतीचे रूप ज्ञान आणि प्रगतीची प्रेरणा देते. देवीची पूजा-अर्चा करतानाच समाजाच्या, गावाच्या आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
‘पद असो वा नसो, समाजासाठी काम करणे महत्त्वाचे’
संदीप चौकेकर यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करताना संदेश पारकर म्हणाले की, गावातील नागरिकांचे प्रश्न समजून घेणारे, त्यांच्या अडचणी जाणून घेणारे आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे कार्यकर्ते समाजाला आवश्यक आहेत. मोठ्या शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील गावांनाही विकासाच्या समान संधी आणि आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी स्थानिक पातळीवर सामाजिक भान असलेल्या नेतृत्वाची गरज आहे.
‘सत्ता असो वा नसो, पद असो वा नसो; समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन काम करणे महत्त्वाचे आहे,’ असे सांगत त्यांनी संदीप चौकेकर यांच्या कार्यामागील सामाजिक जाणीवेचे कौतुक केले. स्वतःच्या परीने गावासाठी शक्य तेवढे योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न असून, अशा कार्यकर्त्यांना नागरिकांनी पाठबळ दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर
गावाच्या विकासासाठी काम करताना युवकांच्या रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने विचारात घ्यावा. गावातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, स्थानिक प्रश्न मार्गी लागावेत आणि विकासकामांना गती मिळावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन संदेश पारकर यांनी संदीप चौकेकर यांना केले.
यश-अपयश आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असतो. मात्र, अडचणींना सामोरे जात प्रामाणिकपणे जनसेवा करणारे नेतृत्व जनतेच्या मनात स्थान निर्माण करते. त्यामुळे टीका किंवा अडचणींची चिंता न करता सामाजिक कार्य सुरू ठेवावे. जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हेच कार्यकर्त्याचे खरे बळ असते, असे त्यांनी सांगितले. जनतेच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळेच आपल्याला समाजात काम करण्याची संधी मिळाली, असे नमूद करत त्यांनी संदीप चौकेकर यांना भविष्यातील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिरवलवासीयांना निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट लाभावी, तसेच संदीप चौकेकर यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थनाही संदेश पारकर यांनी नवदुर्गा मातेच्या चरणी केली.
संदीप चौकेकर यांनी मानले आभार
यावेळी संदीप चौकेकर यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे स्वागत व सत्कार केला. संदेश पारकर यांच्या मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत आणि त्यांना निरोगी आरोग्य लाभो, अशी प्रार्थना दुर्गामातेकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी शिरवल ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रवीण तांबे, सामाजिक कार्यकर्ते निखित मूरकर, पत्रकार तुळशीदार कुडतरकर, सुनील कुडतडकर, कृष्णा यादव यांच्यासह संदीप चौकेकर मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.