कणकवली : राष्ट्र प्रथम अन् हिंदू केंद्रबिंदू,मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित

शेअर करा

सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत काँग्रेसवर घणाघात; मोदी सरकारच्या काळात हिंदू समाजाला अभिमान वाटेल असे काम..

कणकवली ,दि.१५ जून

२०१४ पूर्वी देशात असलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणातून मोदींनी देशाला बाहेर काढत जागतिक पातळीवर सर्वात सुरक्षित राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा मान मिळवणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखाली देश आता अमेरिका, चीननंतर तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक आणि सामरिक महाशक्ती बनत असल्याचा अभिमान आहे.मोदी सरकारच्या काळात हिंदू समाजाला अभिमान वाटेल असे काम केलं आहे.राष्ट्र प्रथम अन् हिंदू केंद्रबिंदू,मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित असल्याचा विश्वास सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

कणकवली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई, संदीप साटम, मिलिंद मेस्त्री, भाई सावंत आदी उपस्थित होते. यावेळी तपपूर्ती या पुस्तिकेचे प्रकाशन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

२०१४ पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात केवळ वोट बॅंकचे राजकारण केले जात होते. “२०१४ अगोदर देशात सणांवर बंदी घातली जात होती. अल्पसंख्याकांना केंद्रित ठेवून, केवळ ‘वोट बँक’ सांभाळण्यासाठी राजकारण केले गेले. अल्पसंख्याकांच्या लांगून – चालन मुळे हिंदू समाज आणि त्यांच्या जमिनी असुरक्षित होत्या. वफ्फ बोर्ड कायद्यासारख्या जाचक नियमांमुळे अन्याय होत होता. हिंदूच्या अनेक जमीनी लॅंड जिहाद होवून लुटल्या गेल्या आहेत. देशात सतत अतिरेकी कारवाया आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. परंतु 2014 नंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशात सरकार आले. त्यानंतर देशातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री , व मंत्री हिंदू मंदिरांमध्ये जावून महाआरती करताना दिसले. पूर्वी कधी पंतप्रधान महाआरती करताना दिसले होते का?” असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी केला.

२०१४ नंतर देशात ‘राष्ट्र प्रथम’ हाच विचार नजरेसमोर ठेवून वाटचाल सुरू झाली. “मोदी सरकारने हिंदू समाजाला केंद्रबिंदू मानून आदरयुक्त स्थान दिले. वर्षानुवर्षे ज्या राम मंदिराची आपण वाट पाहत होतो, ते अयोध्या येथे भव्य राम मंदिर कोणतीही दंगल न घडता शांततेत आणि डौलाने उभे राहिले. काशी विश्वनाथ, उज्जैन कॉरिडॉरचा विकास करून धार्मिक पर्यटनाला मोठी चालना देण्यात आली. देशातील धार्मिक स्थळे सुरक्षित करून हिंदू समाजाला त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवून देण्याचे ऐतिहासिक कायदे मोदी सरकारने केले, ज्यामुळे हिंदू समाजाला खरी ताकद मिळाली असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी हे देशातच नव्हे, तर परदेशातही आपली हिंदू ओळख अभिमानाने घेऊन वावरतात आणि सनातन धर्माला प्रोत्साहन देतात. आज पाकिस्तान किंवा कोणत्याही जिहादी संघटनेची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही. जर कोणी तसा प्रयत्न केला, तर ‘ऑपरेशन सिंधूर’ सारख्या माध्यमातून कडक कारवाई केली जाते. आज भारत जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून ओळखला जातो, हेच मोदींचे सर्वात मोठे योगदान असून देश त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने अग्रेसर राहील .

पहिल्या तीन देशांमध्ये भारताची अर्थव्यवस्था –


नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत आणि सामरिक शक्तीत मोठी झेप घेतली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यानंतर भारताला जागतिक पातळीवर पहिल्या तीन देशांच्या पंक्तीत आणून ठेवण्याचे अभूतपूर्व काम पंतप्रधान मोदींनी केले असून, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

शेअर करा