सावंतवाडी : शिरोडा बायपास परिसरात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांची कसरत

शेअर करा

दुतर्फा पाण्यामुळे अपघातांचा धोका वाढला

सावंतवाडी दि.०४ जुलै

शिरोडा येथील कॅथॉलिक बँकेसमोरील बायपास परिसरात रस्त्यावर सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे .यामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी तसेच पादचाऱ्यांसाठी कमालीचे जिकिरीचे आणि कसरतीचे बनले आहे. रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने या भागात सातत्याने लहान-मोठे अपघात घडत असल्याचे समोर येत आहे.

या रस्त्यावर साचत असलेल्या पाण्याचा सद्यस्थितीत निचरा होत नाही. बायपास रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती संबंधित विभागाने काळजी न घेतल्यामुळे या परिसरात रस्ता जलमय,चिखलमय झाला आहे.


दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.यामुळे पायी चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे.


पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकी घसरून पडत असून वाहनधारकांना दुखापत होत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांनी आणि वाहनधारकांनी या परिस्थितीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पावसाळा सुरू होऊनही प्रशासनाने या पाणी साचणाऱ्या मुख्य जागेची पाहणी करून उपाययोजना केलेली नाही. दरवर्षी या भागात हीच समस्या उद्भवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरती आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मोठा अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिक आणि वाहनचालक करत आहेत.

शेअर करा