सावंतवाडी : “विभागीय आयुक्तांचा सिंधुदुर्ग दौरा; कारवाई होणार की दौरा केवळ औपचारिक ठरणार?” गुरुदास गवंडे यांचा सवाल

शेअर करा

सावंतवाडी दि.०४ जुलै

कोकण विभागीय आयुक्त आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना, गौण खनिज व्यवहार, बायोमेट्रिक उपस्थिती, कार्यालयीन उपस्थिती, शासनस्तरीय संदर्भ, नागरिकांच्या तक्रारी तसेच जिल्हा प्रशासनाविरोधातील विविध प्रलंबित तक्रारींचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी या दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “या दौऱ्यात संबंधित विषयांवर सखोल आढावा घेऊन दोषींवर योग्य कारवाई केली जाणार का? की हा दौरा केवळ औपचारिक बैठक, पाहुणचार, वडेसागोती, सुरमई, पापलेट, प्रॉन्स आणि वर्गणीपुरताच मर्यादित राहणार?” असा सवाल त्यांनी केला आहे.
जिल्ह्यात गौण खनिज उत्खनन, कार्यालयीन शिस्त, बायोमेट्रिक उपस्थिती आणि नागरिकांच्या तक्रारींबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना विभागीय आयुक्तांच्या भेटीत ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. आता या दौऱ्यातून प्रशासनाला शिस्त लावणारे निर्णय होतात की केवळ औपचारिकता पार पडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शेअर करा