२,५०० रिकाम्या सिमेंट पिशव्या पंचायत समिती कणकवलीला सुपूर्द
कणकवली,दि.२७ऑक्टोंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला हातभार लावत कणकवली तालुका केमिस्ट असोसिएशनतर्फे २,५०० रिकाम्या सिमेंट प्लास्टिक पिशव्या पंचायत समिती, कणकवली येथे सुपूर्द करण्यात आल्या. संघटनेने एकूण ५ हजार पिशव्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यातील पहिल्या टप्प्यात या पिशव्या देण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी व संचालक दयानंद उबाळे, मकरंद घाळसासी, विजय घाडी ,राजेंद्र म्हापसेकर, संजय पाध्ये
कणकवली तालुका कार्यकारिणी पदाधिकारी स्वप्निल माळी, विपुल जुवेकर, योगेश रेडकर व सूरज परब आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पुढाकारातून वनराई बंधारे उभारण्यावर भर दिला जात आहे. या उपक्रमात नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली तालुका केमिस्ट असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमासाठी पिशव्या उपलब्ध करून दिल्या. या वेळी कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. चव्हाण तसेच पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करत पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाच्या कार्यात योगदान देण्याचा संघटनेचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. उर्वरित २,५०० पिशव्या लवकरच सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. या वेळी कणकवली तालुका केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.