Kankavli News: १ कोटी २० लाखांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी उपोषण

शेअर करा

सुशांत नाईक यांचा पीडितांना पाठिंबा; पोलिसांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित

कणकवली,दि.१२ ऑक्टोबर

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी पीडितांनी सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पीडितांना पाठिंबा दिला. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उपोषण स्थगित करण्यात आले.

या प्रकरणातील फिर्यादी सुनील दामोदर धुरे (रा. कलमठ, गावडेवाडी) यांच्या तक्रारीनुसार, शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली. या माध्यमातून एकूण १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. मुलांना शासकीय नोकरी मिळेल आणि त्यांचे भविष्य सुरक्षित होईल, या आशेने पीडित कुटुंबांनी कष्टाने जमवलेली रक्कम दिली होती. मात्र, फसवणूक उघडकीस आल्यानंतर संबंधित कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

या प्रकरणातील आरोपी विनीता विवेक मुंज आणि सुबत्ता गिरीश माळी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग-ओरोस येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी फेटाळले होते. पुढील तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केल्याची माहिती देण्यात आली.

न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही आरोपींना अटक झालेली नसल्याचा आरोप पीडितांनी केला. आरोपींना तातडीने अटक करून प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत पीडितांनी पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले.

यावेळी सुशांत नाईक यांनी उपोषणस्थळी भेट देत पीडितांची व्यथा जाणून घेतली. पोलीस प्रशासनाच्या कार्यवाहीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पीडितांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पोलिसांकडून आश्वासन मिळाल्यानंतर पीडितांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उपोषण स्थगित केले. या वेळी सुनील धुरे, संतोष मस्के, प्रताप दळवी आणि मनीषा नाईक उपस्थित होते.

शेअर करा