कणकवली : सिंधुदुर्गातील जमीन व्यवहारांची चौकशी करा

शेअर करा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे मनसेचे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष शिंगाडे यांची मागणी..

कणकवली ,दि. २० ऑगस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, वैभववाडी, कणकवली तालुक्यांमध्ये १० वर्षांत झालेल्या जमीन व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे मनसेचे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष शिंगाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, स्थानिक शेतकरी व जमीन मालकांच्या उपजीविकेशी निगडित असलेल्या जमिनींच्या मागील दहा वर्षांतील खरेदी-विक्री व हस्तांतरण व्यवहारांची सखोल आणि वस्तुनिष्ठ तपासणी करण्यात यावी. देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांतील जमीन व्यवहारांची कायदेशीरता तपासून आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करावी. गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध भागांत मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी-विक्री व हस्तांतरणाचे व्यवहार झाले आहेत.
या व्यवहारांमध्ये महाराष्ट्रातील लागू जमीन महसूल कायदे, कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम तसेच इतर संबंधित कायदेशीर तरतुदी आणि आवश्यक परवानग्यांचे पालन झाले आहे किंवा नाही, याची पारदर्शकपणे पडताळणी होणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महसूल, भूमिअभिलेख आणि नोंदणी विभागातील सक्षम कार्यालयांनी उपलब्ध अभिलेखांची तपासणी करून कायद्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच कल्लीि७-कक, ७/१२, फेरफार नोंदी आणि इतर प्रमाणित कागदपत्रांच्या प्रती मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व कार्यवाही करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

शेअर करा