बाजारमूल्यापोटी १९ लाख रुपयांची रक्कम भरण्याचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळाल्याची नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती..
कणकवली,दि.२९ सप्टेंबर
कणकवली शहरातील जुन्या भाजी मार्केटच्या आरक्षणासाठी राखीव असलेली जमीन भाजी मार्केट विकसित करण्यासाठी मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जमिनीच्या कब्जे हक्काच्या रकमेपोटी १९ लाख रुपये ६३२ रुपये शासनाकडे भरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून २८ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी भाजी मार्केटच्या आरक्षणासाठी संबंधित जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
कणकवली येथील संबंधित शासकीय जमिनीपैकी जुने भाजी मार्केट, आरक्षण क्र. ५ म्हणून आरक्षित असलेले क्षेत्र भाजी मार्केट विकसित करण्यासाठी मिळावे, अशी मागणी नगरपंचायतीकडून करण्यात आली होती. यासंदर्भात महसूल व वन विभाग तसेच वित्त विभागाच्या विविध शासन निर्णयांचा विचार करण्यात आला.
सदर प्रकरणात शासकीय भूखंडाच्या अर्जदाराकडून कब्जे हक्काची रक्कम (बाजारमूल्य) १९ लाख ६३२ रुपये भरून घेऊन ती शासन जमा करण्यास कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना प्रदान करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.
त्यामुळे कणकवलीतील जुन्या भाजी मार्केटच्या विकासासाठी राखीव जमीन उपलब्ध होण्याच्या प्रक्रियेला आता महत्त्वाची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.