कणकवली : लोरे नं. १ येथे रानभाज्या प्रदर्शन, विक्री व आठवडी बाजार उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

शेअर करा

कणकवली, दि. २ ऑगस्ट

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लोरे नं. १ येथे विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक अन्नसंस्कृती, पौष्टिक आहाराचे महत्त्व आणि उद्योजकतेची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने रानभाज्या प्रदर्शन, विक्री व आठवडी बाजार या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अजय रावराणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या विविध रानभाज्यांच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलची पाहणी करून त्यांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, स्थानिक अन्नसंस्कृतीबद्दल जागरूकता, पौष्टिक आहाराचे महत्त्व तसेच व्यवहारज्ञान विकसित होण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव मिळाल्याने त्यांच्या उद्योजकीय कौशल्यालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या, स्थानिक कृषी उत्पादने आणि इतर वस्तूंचे आकर्षक स्टॉल उभारून आठवडी बाजाराच्या माध्यमातून प्रत्यक्ष विक्री केली. यामुळे विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, ग्राहकांशी संवाद आणि आर्थिक व्यवहारांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

प्रदर्शनाला पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी तसेच विविध मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक सतीश गोसावी तसेच शिक्षक मनोहर मराठे, दीपक काळे, रचना गवाणकर, सारिका परीट, अंगणवाडी सेविका व मदतनीस, पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी नरेश गुरव, सुमन गुरव, अनंत रावराणे, बाबा रावराणे, विजय रावराणे, रमेश रावराणे, सचिन सावंत, सदानंद गुरव तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा