Kudal Crime :वडिलांनी दुचाकी घेऊन न दिल्याच्या रागातून १५ वर्षीय मुलाची आत्महत्या;कुडाळमध्ये हळहळ

शेअर करा

बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास;ग्रामीण रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू

कुडाळ,दि.३० ऑक्टोंबर
वडिलांनी गाडी घेऊन दिली नाही, या कारणावरून आलेल्या रागातून कुडाळ येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. युवराज विजय परब (वय १५ वर्षे ९ महिने) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे कुडाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज परब हा आपल्या वडिलांसोबत कुडाळ येथील मेहनील प्लाझा, सी विंग येथे के. पी. तुळसकर यांच्या खोलीत भाड्याने राहत होता. वडिलांनी आपल्याला गाडी घेऊन दिली नाही, या कारणावरून त्याच्या मनात राग होता. याच रागातून त्याने २९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० ते ११.३० या कालावधीत राहत्या खोलीतील बेडरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.
ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय, कुडाळ येथे दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी त्याचे वडील विजय विद्याधर परब (वय ३९) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात खबर दिली.
या घटनेची कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ५९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे ३० ऑक्टोबर रोजी पहाटे १.१९ वाजता नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार भोई हे पुढील तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून, क्षणिक रागातून घेतलेला टोकाचा निर्णय एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळवणारा ठरला आहे.

शेअर करा