काय काम नसेल तर एसीबीला आमच्यासारख्या शिवसैनिकांचीही चौकशी करावी- पंचायत समिती गटनेते आणि पंचायत समिती सदस्य योगेश धुरी
कुडाळ, दि. ०९ जून
गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना सोडावी यासाठी सत्ताधाऱ्यांकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, वैभव नाईक हे प्रामाणिक, एकनिष्ठ आणि जिल्ह्यातील शिवसैनिकांना लढण्याचे बळ देणारे नेतृत्व आहे. त्यामुळे अशा दबावतंत्रांना ते बळी पडणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे.
यापूर्वीही वैभव नाईक यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली. मात्र त्या चौकशीत कोणतेही गैरप्रकार आढळले नाहीत. त्यामुळे आता पुन्हा त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्यामागचे कारण काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक धनाढ्य आणि प्रभावशाली व्यक्ती आहेत. मात्र, एसीबीला वारंवार वैभव नाईक यांच्याच चौकशीची गरज का भासते, हे जनतेच्या लक्षात येत आहे. सिंधुदुर्गची जनता सुज्ञ आहे आणि या सर्व घडामोडींकडे ती बारकाईने पाहत आहे.
या प्रकारामुळे आगामी काळात सिंधुदुर्गची जनता अधिक ठामपणे वैभव नाईक यांच्या पाठीशी उभी राहील, असा मला विश्वास आहे.
एसीबीकडे जर दुसरे कोणतेही महत्त्वाचे काम नसेल, तर आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या कार्यालयात जाऊन आमचीही चौकशी करण्याची विनंती करू. कारण एसीबीला काम मिळावे म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक “आमचीही चौकशी करा” अशी मागणी करणार आहोत.