आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर धडक मोहिम; ठाणे जिल्ह्यात विशेष कारवाई, नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह अनेक ठिकाणी छापेमारी
अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अन्नसुरक्षा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर लक्ष केंद्रित करत एफडीएने विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर छापेमारी सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात ३० आणि ३१ मे रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी विशेष कारवाई राबवली. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह अनेक भागांत अचानक धाडी टाकण्यात आल्या.
या कारवाईदरम्यान कृत्रिम पद्धतीने पिकवण्यात आलेल्या आंब्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. तपासणीमध्ये काही व्यापारी आंबे लवकर पिकवण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने इथिलिनसदृश्य स्प्रेचा थेट वापर करत असल्याचे उघड झाले. यानंतर एफडीएने कठोर पावले उचलत ३ मोठ्या आस्थापनांवर कारवाई केली. एकूण ३,४५३ किलो आंबे जप्त करण्यात आले असून, त्यांची अंदाजे किंमत ११ लाखांहून अधिक आहे. जप्त केलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. एफएसएसएआयच्या नियमानुसार फळे पिकवण्यासाठी थेट रासायनिक स्प्रेचा वापर करण्यास बंदी आहे. त्याऐवजी इथिलिन गॅस चेंबरचा वापर बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.
दिलासादायक बाब म्हणजे कॅल्शियम कार्बाइड या अत्यंत घातक रसायनाचा वापर कुठेही आढळून आला नाही. याच कालावधीत जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राज्यभर गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधातही विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत ३६ आस्थापनांवर छापे टाकण्यात आले असून, सुमारे ४.७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच ३७ जणांना अटक करण्यात आली असून, ३१ आस्थापने सील करण्यात आली आहेत. एफडीएने नागरिकांना आवाहन केले आहे की, भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित अन्नपदार्थांची माहिती मिळाल्यास तातडीने तक्रार करावी. यासाठी १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रशासनाने ही मोहीम पुढेही अधिक कठोरपणे सुरू राहील, असा इशाराही दिला आहे.