मालवण शहरात डास प्रतिबंधक फवारणी मोहिम सुरु

शेअर करा

मालवण,दि.०३ जुलै

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात गेल्या काही दिवसांत डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालवण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात व्यापक स्तरावर डास प्रतिबंधक फवारणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

मालवण शहरात डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालवण नगरपालिकेने तातडीने खबरदारीची पावले उचलली असून डास प्रतिबंधक फवारणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत देऊळवाडा परिसरासह शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा मच्छरांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी उच्च दाबाच्या यंत्राद्वारे कीटकनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. नाले, झाडीझुडपे, रस्त्यालगतची जागा तसेच मच्छरांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

ही मोहीम आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नगरसेविका सौ. नीना मुंबरकर, स्वच्छता निरीक्षक श्री. संजय पवार, मुकादम श्री. आनंद वळंजू, सहायक मुकादम श्री. बाळकृष्ण जाधव तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांनी आपल्या परिसरात पाणी साचू देऊ नये तसेच स्वच्छता राखावी आणि मच्छरांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा