आधुनिक तंत्रज्ञानाशी विद्यार्थी होणार एकरूप
मालवण,दि. २० ऑगस्ट
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटीलिजन्स म्हणजेच एआय च्या युगात विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत या विचारातून मालवण तालुक्यातील माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर या प्रशालेने ईआय -टिंकर लॅबची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, कोडिंग, रोबोटिक्स आणि नवोन्मेषी विचारांची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने निर्माण केलेल्या या ईआय -टिंकर लॅबचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबाराव राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव श्री घन:श्याम राणे, ईआय -टिंकर लॅबचे डायरेक्टर श्री. अभिजीत सहस्रबुद्धे, श्री. कृष्णमूर्ती, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश तावडे सर, माजी मुख्याध्यापक श्री. सुरेश परब, कुणकवळे केंद्राचे केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी श्री. श्रीकृष्ण सावंत, कट्टा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. गौरव नाईक, संस्थेचे पदाधिकारी श्री. अतीक शेख, श्री. सुभाष सावंत, श्री. प्रदीप सावंत, ग्रामपंचायत खरारे पेंडूरच्या प्रभारी सरपंच सौ. परब, ग्रामसेविका सौ. सापळे, पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. संजय वारिक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी लॅबची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधांची माहिती घेतली. या ईआय -टिंकर लॅबमध्ये रोबोटिक्स, कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाच्या युगासाठी सक्षम बनविण्याच्या दृष्टीने न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगत या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच प्रयोगातून शिक्षण, तंत्रज्ञानातून नवसर्जन आणि नवसर्जनातून उज्ज्वल भविष्य” या उद्देशाने सुरू झालेली ईआय -टिंकर लॅब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.