मालवण : दिव्यांग निधी लाभासाठी मालवण नगरपरिषदेकडून नोंदणीचे आवाहन

शेअर करा

मालवण ,दि. २० ऑगस्ट

शासन निर्णयानुसार मालवण नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या निधीच्या लाभासाठी मालवण शहरातील दिव्यांग व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रासह मालवण नगरपरिषदेकडे दिव्यांग व्यक्ती म्हणून नोंद करून घ्यावी असे आवाहन मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासन, नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार २०२६- २७या आर्थिक वर्षामध्ये मालवण नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षात मालवण नगरपरिषद कार्यालयाकडे एकूण १२८दिव्यांग व्यक्तींची नोंदणी झालेली आहे. मालवण शहरातील ज्या दिव्यांग व्यक्तींनी मालवण नगरपरिषदेकडे नोंदणी केलेली आहे. परंतु अद्याप हयातीचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही, अशा दिव्यांग व्यक्तींनी आपले हयातीचे प्रमाणपत्र दि. ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत नगरपरिषद कार्यालयीन वेळेत मालवण नगरपरिषद कार्यालयात जमा करावे. ज्या दिव्यांग व्यक्तींनी हयातीचे प्रमाणपत्र सादर केलेले आहे, अशा पात्र दिव्यांग व्यक्तींना शासन नियमानुसार व निर्धारित टक्केवारीनुसार उदरनिर्वाहाकरिता निधीचे वाटप थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये NEFT/RTGS द्वारे करण्यात येणार आहे.

तसेच मालवण नगरपरिषद ह‌द्दीतील ज्या दिव्यांग व्यक्तींनी अ‌द्याप नगरपरिषदेकडे नोंदणी केलेली नाही, अशा दिव्यांग व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह मालवण नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून दिव्यांग व्यक्ती म्हणून नोंदणी करून घ्यावी. सर्व संबंधित दिव्यांग बांधवांनी आवश्यक कार्यवाही करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण नगरपरिषदेमार्फत करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी श्री. थोरात यांनी म्हटले आहे.

शेअर करा