Malvan : काळसे नमसवाडी अंगणवाडी येथेराष्ट्रीय पोषण माह अभियान आणि सेवा संकल्प महाअभियान संपन्न

शेअर करा

सभापती प्रज्ञा चव्हाण यांची मुख्य उपस्थिती;महिलांसाठी पाककला, रांगोळी स्पर्धांचे केले होते आयोजन

मालवण,दि.०४ ऑक्टोंबर

९ वा राष्ट्रीय पोषण माह अभियान आणि सेवा संकल्प महाअभियानांतर्गत मालवण तालुक्यातील काळसे गावातील नमसवाडी अंगणवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानांतर्गत अंगणवाडी केंद्राच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला आणि मातांसाठी पाककला स्पर्धा (पौष्टिक आहार) रांगोळी स्पर्धा यांचा समावेश होता. या अभियानाचा प्रमुख उद्देश असा की, बालकांचे कुपोषण कमी करणे, स्तनदा आणि गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे होय. या अनुषंगाने अंगणवाडी-काळसे नमसवाडी, येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना पौष्टिक आहाराचे महत्व पटवून दिले. तसेच आजच्या जीवनात स्थानिक भाज्या आपल्या आहारात समाविष्ट करून घेतल्या पाहिजेत, त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील, असा सल्ला दिला.


या कार्यक्रमावेळी प्रकल्प अधिकारी उलका हजारे, पर्यवेक्षिका भगत ग्रामसेविका शेलटकर, ग्रामपंचायत सदस्य सुजाता परब, मोनिका म्हापणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अंगणवाडीसेविका वैशाली प्रभू आणि शांती महाजन यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.

शेअर करा