मालवण,दि. ७ जून
मराठी साहित्यात ऐतिहासिक कादंबरी हा प्रकार दीर्घकाळ पुरुष लेखकांच्या वर्चस्वाखाली राहिला. अशा काळात इतिहासातील दुर्लक्षित व्यक्तिरेखा, विशेषतः स्त्रियांचे कर्तृत्व, साहित्याच्या केंद्रस्थानी आणणारे नाव म्हणजे नयनतारा देसाई. सिंधुदुर्गातील मालवण या सांस्कृतिक भूमीत जन्मलेल्या या लेखिकेने ऐतिहासिक कादंबरीला एक वेगळी दिशा दिली आणि मराठी वाचकांच्या मनात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले.
नयनतारा देसाई यांचा जन्म ६ मार्च १९२५ रोजी मालवण येथे झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण मालवणमध्येच झाले. पुढे विवाहानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. संसार सांभाळत त्यांनी बी.ए. पदवी प्राप्त केली. त्याचबरोबर हिंदी शिक्षक सनद आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा पंडित या पदव्याही मिळवल्या. शिक्षिका म्हणून त्यांनी पुणे, नाशिक आणि उरळी कांचन येथे दीर्घकाळ अध्यापन केले. शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी साहित्यलेखनाला पूर्णवेळ वाहून घेतले.
त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू इतिहास होता. मात्र तो केवळ राजे-महाराजांचा इतिहास नव्हता; तर इतिहासाच्या पानांमध्ये उपेक्षित राहिलेल्या व्यक्तिमत्त्वांचा शोध घेणारा इतिहास होता. त्यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये संशोधन, कथनकौशल्य आणि वाचकांशी संवाद साधण्याची ताकद यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो.
‘समिधा’ या राणी चन्नम्मावर आधारित कादंबरीपासून त्यांच्या ऐतिहासिक लेखनाला विशेष ओळख मिळाली. त्यानंतर ‘तेवतो नंदादीप हा!’ (सावित्रीबाई फुले), ‘अग्निज्वाला’ (वासुदेव बळवंत फडके), ‘बेडीच झाली फुले’ (बाबाराव सावरकर), ‘रामशास्त्री प्रभुणे’, ‘तेज उजळले भानूचे’ (नाना फडणीस), ‘शिरकमल अमर जाहले’ (बापू गोखले), ‘समई निसूर जाहली’ (रमाबाई पेशवे), ‘इप्सित पूर्ण जाहले’ (जिजाऊ), ‘रणरागिणी’ (राणी लक्ष्मीबाई) अशा अनेक गाजलेल्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले.
त्यांच्या लेखनातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ऐतिहासिक स्त्री व्यक्तिरेखांचे प्रभावी चित्रण. जिजाऊ, रमाबाई पेशवे, येसूबाई, राणी लक्ष्मीबाई, शारदामाता यांसारख्या स्त्रियांना त्यांनी केवळ ऐतिहासिक संदर्भ म्हणून न मांडता, त्यांच्या विचारांचे, संघर्षांचे आणि नेतृत्वगुणांचे जिवंत चित्र उभे केले. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांमधील स्त्री पात्रे इतिहासातील सावली न राहता स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून वाचकांसमोर उभी राहतात.
इतिहासाबरोबरच त्यांनी सामाजिक वास्तवावर आधारित कादंबऱ्याही लिहिल्या. ‘मळभ’, ‘थ्रिल’, ‘नदी वाहतेच आहे’, ‘भंगलेली लय’, ‘वळू नको माघारी’, ‘नातिचरामि’ अशा सामाजिक कादंबऱ्यांमधून समाजातील बदलते प्रश्न आणि मानवी नातेसंबंध यांचे चित्रण त्यांनी केले. यामुळे त्या केवळ ऐतिहासिक कादंबरीकार न राहता व्यापक आशयाच्या साहित्यिक ठरल्या.
त्यांनी कथासंग्रह आणि कादंबरिकांच्या माध्यमातूनही विपुल लेखन केले. ‘कथा शिवरायांच्या’, ‘पेशवाईचा उदय’, ‘समर्पण’, ‘सोनेरी क्षण’ यांसारखे कथासंग्रह तसेच ‘दर्याचा राजा’, ‘समशेर बहाद्दर’, ‘नाना फडणीस’, ‘सखाराम बापू’ यांसारख्या कादंबरिकांमधून त्यांनी इतिहास सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवला.
नयनतारा देसाई यांच्या लेखनाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांचे संशोधन. त्या ज्या विषयावर लिहीत असत, त्या विषयाशी संबंधित स्थळांना भेट देत, संदर्भग्रंथांचा अभ्यास करत आणि त्यानंतरच लेखन करत. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये ऐतिहासिक विश्वासार्हता आणि साहित्यिक रंजन यांचा समतोल दिसून येतो.
मराठी साहित्यविश्वात त्यांना हवी तितकी समीक्षात्मक दखल मिळाली नसली तरी वाचकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. विशेषतः इतिहास वाचकप्रिय बनवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. स्त्री लेखकांबद्दलच्या मर्यादित दृष्टिकोनाला त्यांनी आपल्या लेखनातून प्रभावी उत्तर दिले.
मालवणच्या मातीत जन्मलेली ही साहित्यकन्या आयुष्यभर कोकणाशी भावनिक नाते जपत राहिली. त्यांच्या लेखनातून कोकणाची संस्कृती, संवेदनशीलता आणि इतिहासाविषयीची ओढ सातत्याने जाणवते. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या क्षेत्रात नयनतारा देसाई यांचे योगदान मोलाचे असून, इतिहासातील अनेक विस्मृतीत गेलेल्या व्यक्तिमत्त्वांना त्यांनी साहित्याच्या माध्यमातून अजरामर केले आहे.
मराठी साहित्यातील लोकप्रिय ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून नयनतारा देसाई यांचे नाव आदराने घेतले जाईल. त्यांच्या लेखनामुळे इतिहास केवळ अभ्यासाचा विषय न राहता वाचकांच्या भावविश्वाचा भाग बनला, हेच त्यांच्या साहित्यसेवेचे खरे यश म्हणावे लागेल.
अगदी जाता जाता अस्सल कोकण समजून घेण्यासाठी नयनतारा देसाई ह्यांची मानस कादंबरी कधी मिळाली तर नक्की वाचा