Malvan News : ‘मत वाचवा – देश वाचवा’ रॅलीसाठी सिंधुदुर्ग काँग्रेसचे पदाधिकारी दिल्लीला रवाना!

शेअर करा

१ नोव्हेंबरला रामलीला मैदानावर होणाऱ्या भव्य रॅलीत जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते होणार सहभागी!

मालवण,दि. ३१ ऑक्टोबर

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानांतर्गत भव्य रॅलीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहेत.

मतदान प्रक्रियेतील अनियमितता आणि मतचोरीच्या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विशेष माहितीपत्रक छापण्यात आले असून या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या माध्यमातून मतदारांना अभियानाची भूमिका आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मतचोरीच्या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठवणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीला राहुल गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे संबोधित करणार आहेत. मतदान प्रक्रियेतील गोंधळाबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्टीकरण द्यावे, तसेच या प्रकरणामागील जबाबदार व्यक्तींची नावे समोर आणावीत, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केली आहे. निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास कायम राखणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रविवारी होणाऱ्या या रॅलीत देशभरातून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीमध्ये दाखल झाले असून, आणखी कार्यकर्ते रॅलीसाठी दिल्लीकडे रवाना होत आहेत.

मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदारांचा अधिकार आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी जनतेचा संघटित आवाज बुलंद करण्याचा निर्धार या रॅलीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही या आंदोलनातून करण्यात येणार असल्याचे अरविंद मोंडकर यांनी सांगितले.

शेअर करा