मालवण: कट्टा महाविद्यालयात महिला आरोग्य शिबिर उत्साहात; युवतींनी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावे – साबाजी गावडे

शेअर करा

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शिबिराचे आयोजन; मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ

मालवण,दि.०१ ऑगस्ट

युवती हे देशाचे भवितव्य आहे, एक सशक्त स्त्रीच सशक्त समाजाची निर्मिती करू शकते. महाविद्यालयीन वयातच युवतीने आपल्या भविष्याची काळजी घेतली पाहिजे. आजच्या युवतीने मानसिक व शारीरिक दृष्ट्या सशक्त होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे सहसचिव साबाजी गावडे यांनी कट्टा महाविद्यालयाच्या वतीने आयोजित महिला आरोग्य शिबिर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी उपस्थित कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समिती कट्टा चे अध्यक्ष आनंद वराडकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी विचारमंचावर वराडकर हायस्कूल कट्टा चे स्कूल कमिटी चेअरमन व संस्था संचालक सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. जाई पोळ, वराडकर हायस्कूल कट्ट्याच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा चे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, उपप्राचार्य रवींद्र गावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व माझे गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत ग्रामीण रुग्णालय कट्टा पेंडूर व डॉ. दादासाहेब वराडकर कला वाणिज्य महाविद्यालय कट्टा च्या महाविद्यालय विकास समिती च्या वतीने किशोरवयीन मुली आणि महाविद्यालयीन तरुणीं साठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा थेट परिणाम हा आरोग्यावर होतो त्यामुळे विद्यार्थिनींनी जागरूक राहून सकस आहाराला प्राधान्य द्यावे. व हाच उद्देश ठेवून आमच्या महाविद्यालयाने सदर आरोग्य शिबिराचे आयोजन केले असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी प्रास्ताविकेतून केले.
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत उद्भवणाऱ्या छोट्या मोठ्या आरोग्य समस्यांकडे विद्यार्थिनींनी दुर्लक्ष करता कामा नये. अशक्तपणा टाळण्यासाठी संतुलित आहार, व शरीरात लोहाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय पोळ यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
या कार्यक्रमास जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. बालन, जिल्हा दंतचिकित्सक डॉ. चाटे, ग्रामीण रुग्णालय कट्टा पेंडूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. जाई पोळ व सर्व आरोग्य कर्मचारी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण चे सर्व आरोग्य कर्मचारी यांनी कट्टा संस्थेच्या तिन्ही विभागाच्या किरोरवयीन मुली व महाविद्यालयीन युवती तसेच सर्व महिला शिक्षिका व कर्मचारी असे एकूण २१९ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच या प्रसंगी भारत सरकारच्या नशामुक्ती कार्यक्रमाअंतर्गत उपस्थितांना नशा न करण्याविषयी शपथ देखील देण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या करिअर कट्टा विभागांतर्गत महाविद्यालयाच्या प्रा. श्रृती कुंभार यांची निवड करिअर कट्टा मालवण तालुका समन्वयक म्हणून झाली, त्यानिमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विकास कक्ष सहाय्यक प्रा. श्रुती कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. पौर्णिमा मसुरकर यांनी केले.

शेअर करा