मिठमुंबरी समुद्रकिनारी दुर्घटना; पाच पर्यटक मित्रांपैकी एक तरुण समुद्रात बेपत्ता

शेअर करा

देवगड येथे पर्यटनासाठी आलेल्या पाच मित्रांवर काळाचा घाला; स्थानिक मच्छीमारांच्या प्रसंगावधानामुळे तिघांना जीवदान, बेपत्ता युवकाचा शोध सुरू

देवगड

तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पाच मित्रांपैकी एक तरुण समुद्राच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे तिघा तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, एकाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. बेपत्ता तरुणाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथून देवगड येथे पर्यटनासाठी आलेले पाच मित्र मिठमुंबरी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी चौघेजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता अचानक खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिक व मच्छीमार बांधवांनी तात्काळ धाव घेतली.

स्थानिक मच्छीमारांनी तीन होड्यांच्या सहाय्याने समुद्रात उतरून बचावकार्य सुरू केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तिघा युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, चैत्यन्य राजेंद्र गुरव (वय २२) हा तरुण समुद्रात बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे. बचावण्यात आलेल्या युवकांमध्ये ओम दीपक चव्हाण (१७), यश राजेंद्र उपरकर (२२), सोहंम जयेश मंडोत (२०) आणि अर्णव उपरकर (१७, सर्व रा. मुंबई) यांचा समावेश आहे. यापैकी एका युवकाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळाली.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने समुद्रकिनारी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे मिठमुंबरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रविण सावंत, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर तसेच मत्स्यव्यवसाय सुरक्षा रक्षक इंद्रजित येरम यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. बेपत्ता तरुणाचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

या बचावकार्यात स्थानिक मच्छीमार लक्ष्मण मनोहर तारी, रमेश तारी, मनीष तारी, बाबुराव धुरी आणि बाळा राजम यांनी मोलाची भूमिका बजावत प्रसंगावधान दाखविले. स्थानिकांच्या धाडसामुळे तिघा युवकांचे प्राण वाचल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा