Mumbai News:वैश्य वाणी समाजाच्या ओबीसी दाखल्यांसाठी पाठपुरावा; आमदार प्रमोद जठार यांचा सत्कार!

शेअर करा

विधिमंडळात आवाज उठविल्याची दखल; ‘वैश्य समाज, मुंबई’ संस्थेकडून गौरव!

मुंबई,दि.२७ऑक्टोंबर

वैश्य वाणी समाजाला ओबीसी दाखले मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विधिमंडळात आवाज उठविण्यासह संबंधित मंत्र्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत ‘ वैश्य समाज, मुंबई’ संस्थेच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा सत्कार करण्यात आला.

समाजाच्या हक्कांसाठी केलेल्या प्रयत्नांना मिळालेली ही पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सोहळ्यात कांजूरमार्ग, मुंबई येथील समाजभगिनी तथा नगरसेविका सौ. श्वेता राजेश पावसकर यांनी आपल्या भाषणातून आमदार प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आमदार प्रमोद जठार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि शासनाकडून जीआर (GR) काढून घेतल्यामुळे माझे नगरसेवक पद शाबूत राहिले व मला न्याय मिळाला,” असे सौ. श्वेता पावसकर यांनी सांगितले.

समाजाच्या हक्कांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे लोकप्रतिनिधीला न्याय मिळाल्याचा हा क्षण आमदार प्रमोद जठार यांच्यासाठी भावुक आणि अभिमानास्पद ठरला. हा सत्कार केवळ व्यक्तीचा नसून वैश्य वाणी समाजाच्या एकजुटीचा, संघर्षाचा आणि हक्कांच्या लढ्याचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

वैश्य वाणी समाजाच्या हक्कांसाठी शासनदरबारी यापुढेही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा विश्वास आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी वैश्य समाज मुंबई चे सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा