१२ व १३ सप्टेंबरला मुंबईहून सुटणार; १३ व १४ सप्टेंबरला सावंतवाडीहून परतीचा प्रवास
मुंबई,दि.१२ सप्टेंबर
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेमार्गावर मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड आणि सावंतवाडी रोड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान अतिरिक्त विशेष अनारक्षित गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडी क्रमांक ०१००९ मुंबई सीएसएमटी–सावंतवाडी रोड अनारक्षित विशेष गाडी १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई सीएसएमटी येथून दुपारी १.४५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
तर गाडी क्रमांक ०१०१० सावंतवाडी रोड–मुंबई सीएसएमटी अनारक्षित विशेष गाडी १३ आणि १४ सप्टेंबर रोजी पहाटे ४.०५ वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
या गाडीमध्ये एकूण २० डबे असणार असून त्यामध्ये १२ स्लीपर, ६ जनरल आणि २ एसएलआर/डी डब्यांचा समावेश आहे.
गाडीचे सविस्तर थांबे व वेळापत्रक रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी या अतिरिक्त विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.