मुंबई दि.१८ जून
गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर १३ मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (गृहनिर्माण) यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊन,गिरणी कामगारांच्या प्रश्नावर अपर मुख्यसचिव(गृहनिर्माण) असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक सचिवस्तरावर समिती गठीत करण्यात आली होती.त्या समितीची पहिली बैठक निर्मल भवन येथे आज अध्यक्ष असीम गुप्ता आणि संबंधित शासकीय विभागाचे सचिव,१६ कामगार संघटना नेत्यांबरोबर पार पडली. गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी सरकारने सचिव स्तरावर नेमलेल्या समितीचे अध्यक्ष असीम गुप्ता यांच्याशी चर्चा करताना,सरकारने आश्वासित केल्या प्रमाणे प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढावा असा प्रथम आग्रह धरला.
गिरणी कामगारांनी मुंबईच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे.त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हक्कांसाठी शासनस्तरावर प्रभावी भूमिका मांडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही याप्रसंगी अपर मुख्य सचिव(गृहनिर्माण )असीम गुप्ता यांनी दिले आहे
मुंबईतील ज्याज्या जागेसंबंधात कायदेशिर अडचण नाही, त्यात्या जागेवर गिरणी कामगारांना नजिकच्या काळात घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्वरेने केला जाईल,असे सांगताना,अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी सांगितले की, ज्या गिरण्यांचे काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल क्रमांक ४च्या जागेवर तसेच वेस्टर्न इंडियाच्या जागेवर काही गिरण्यांच्या जमिनीचे एकत्रीकरण करून कामगारांना घरे बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे आहे, त्यावर संबंधितांशी चर्चा करून तो प्रश्न मार्गी लावला जाईल. इंदू मिल क्रमांक २ व ३ ची जागा टेक्स्टाईल म्युझियमसाठी महापालिकेला देण्यात आली आहे. त्यातील पाच एकर जागा म्युझियमसाठी सोडली तर १८ एकर जमिन गिरणी कामगारांना घरे बांधण्यासाठी देण्यात यावी,या प्रस्तावाचा देखील आपण महापालिकेशी चर्चा करू! आतापर्यंत फॉर्म न भरलेल्या वंचित कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्रीस्तरावर बैठक घेऊन तो प्रश्न मार्गी लागला जाईल,असे असीम गुप्ता यांनी सांगितले.मुंबईत घरे उपलब्ध होण्यासाठी खार जमीन,बीडीचाळ,एनटीसी गिरण्यांच्या जागा,सेंचुरी मिलच्या महापालिकेकडे असलेल्या सहा एकर जमिनीवर गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देणे,रिपेरिंग बोर्ड,मुंबईत पुनर्विकास होणाऱ्या जागेवर तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अधिकचा एक एफएसआय देऊन गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देणे,खटाव बोरवली येथे गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देणे,आज बांधून तयार असलेल्या बॉम्बे डाईग,न्यू ग्रेट मिलच्या गिरणी कामगारांना घरे देणे आदि प्रश्नावर सविस्तर चर्चा होऊन,घराचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले आहे.
गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर लवकरच कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा,असा आग्रह धरला आहे.गिरणीचाळ भाडेकरू संघाचे भाऊसाहेब आंग्रे यांनी गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्वसनाचे काम लवकरच हाती घ्यावे,असा बैठकीत आग्रह धरला आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष बजरंग चव्हाण,सर्व श्रमिक संघटनेचे कॉम्रेड विजय कुलकर्णी,हेमन धागा जनकल्याण फाउंडेशनचे हेमंत गोसावी,संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे विवेकानंद बेलोसे,रमाकांत बने,एनटीसी कामगार असोसिएशनचे ऍड.बबन मोरे,गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे आनंद मोरे,गिरणी कामगार सभेचे हरिनाम तिवारी,मुंबई गिरणी कामगार युनियनचे ऍड.अरुण निंबाळकर,सातारा जिल्हा कामगार समितीचे दिलीप सावंत,गिरणी कामगार रोजगार आणि निवाराचे हेमंत राऊळ,कोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीचे रमेश मेस्त्री,जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे राजेंद्र साळसकर,कल्याण सेवाभावी संस्थेचे विजय चव्हाण,गिरणी चाळ भाडेकरू संघाचे भाऊसाहेब आंग्रे,दत्ता ईश्वलकर गिरणी कामगार संघाच्या वैशाली गिरकर आदींनी उपस्थित राहून आपले प्रश्न मांडले.गिरणी कामगार प्रश्नावर सरकारने दिलेल्याआश्वासनाची पूर्ती व्हावी,यासाठी गिरणी कामगारांचा संघर्ष आणि पाठपुरावा चालूच होईल,असे लढा समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी म्हटले आहे.
