नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण : आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; सोलापुरातून भर चौकात शिक्षेची मागणी

शेअर करा

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत; अवघ्या ५५ दिवसांत खटल्याचा निकाल, तपास पथकाच्या कामगिरीचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी केले कौतुक

भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी २६ जून रोजी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. मात्र, शिक्षेचा अंतिम निर्णय आज जाहीर करण्यात आला.

या निकालानंतर राज्यभरातून समाधान व्यक्त करण्यात येत असून, सोलापूरमध्ये नागरिकांनी बॅनर झळकावत न्यायव्यवस्थेचे आभार मानले. सरकारने हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून अवघ्या ५५ दिवसांत निकाल दिल्याबद्दल समाधान व्यक्त करत, आरोपीला केवळ फाशीची शिक्षा न देता भर चौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली. अशा कठोर शिक्षेमुळे भविष्यात अशा प्रकारच्या अमानुष घटना घडण्यास आळा बसेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी या प्रकरणाच्या तपासाची माहिती देताना सांगितले की, या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. सुमारे १५ दिवसांत महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले तसेच साक्षीदारांचा शोध घेण्यात आला. महिला पोलीस अधिकारी विजयमाला पवार यांनी तपास अधिकारी म्हणून जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. तपासात सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सरकारी वकिलांच्या पथकाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

या प्रकरणात तब्बल १,२०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. तसेच ५५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. भारतीय न्याय संहितेतील नव्या तरतुदींनुसार राज्यातील पहिलाच ऑनलाईन पंचनामा करण्यात आला होता. अत्यंत संवेदनशील आणि वैज्ञानिक पद्धतीने तपास पूर्ण झाल्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा मिळू शकली, असेही संदीपसिंग गिल यांनी स्पष्ट केले.

शेअर करा