ओरोस : कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतक-यांना केंद्रबिंदू ठेवत आदर्शवत काम : मनीष दळवी

शेअर करा

नांदगाव मार्केट यार्डचे जानेवारीत उद्घाटन ; कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वसाधारण सभा

ओरोस,दि.२९ सप्टेंबर

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळावी, बाजार व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नांदगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड उभारण्याचे काम सुरू आहे. या मार्केट यार्ड पहिल्या टप्प्यांतील सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून जानेवारी महिन्यात उद्घाटन होईल.आंबा-काजू बागायतीवरही प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या पिकांचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना दिशा देण्यात येणार आहे. यासाठी १० नोव्हेंबर रोजी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतक-यांना केंद्रबिंदू ठेवत आदर्शवत काम होत असल्याचे कौतुगोद्गार बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले.

सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक सहकार्य पतपेढी सभागृह सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे , उपसभापती प्रसाद पाटकर, संचालक आनंद ठाकूर, प्रदिप मांजरेकर, मंगेश ब्रम्हदंडे, अशोक पराडकर, सदानंद सर्वेकर,किरण रावले, मकरंद जोशी, सुर्यकांत बोडके, सावंतवाडी खरेदी विक्री चेअरमन प्रमोद गावडे, सोसायटी चेअरमन भगवान लोके , प्रशांत सावंत, वसंत तेंडुलकर, सदाशिव आळवे, शिला निर्गुण , सुनील रावराणे,उमेश नाईक, मुकुंद धुरी, मंगेश गांवकर, पांडुरंग सावंत, रघुनाथ राणे, विजय देसाई, संजय आमकर यांच्यासह जिल्ह्यातील विकास संस्था चेअरमन , व्यापारी , सदस्य , सरपंच , सदस्य उपस्थित होते. प्रथम सरस्वती मातेला पुष्पहार व दिपप्रज्वलन करुन सभेला प्रारंभ करण्यात आला.
मनीष दळवी म्हणाले, बाजार समिती उभी राहावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. नांदगाव येथे पहिल्या टप्प्यात मार्केट यार्ड उभारले जात असून भविष्यात अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बाजार समितीचे कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये आहे. बांदा येथे उपबाजारासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने 5 एकर जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मत्स्यबाजारासाठीही जागा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा परिणाम भात खरेदीवर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी पावसाची गरज आहे. फळपिके वाचविण्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून कच्चे बंधारे उभारण्यासह स्थानिक पातळीवर पुढाकार घेण्याची गरज आहे. केवळ शासनावर विसंबून राहून चालणार नाही. शेतकऱ्यांवरील संकट रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
सभापती तुळशिदास रावराणे म्हणाले, नांदगाव येथील मार्केट यार्डसाठी शासकीय जमीन मिळावी , यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना पत्र दिले. मात्र शासकीय जमीन उपलब्ध न झाल्याने नांदगाव रेल्वे स्थानक परिसरातील खासगी जमीन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेच्या सहकार्याने १२.५ एकर जमीन खरेदी करण्यात आली असून त्यासाठी दोन कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा बॅंकेत उपलब्ध झाले. त्यानंतर इमारत व आवश्यक व्यवस्था उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. सिंधुरत्न योजनेअंतर्गत आ.दीपक केसरकर यांच्या माध्यमातून 5 कोटी निधी मंजूर झाला असून त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे यांच्या सहकार्याने निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार निवारा शेड इमारतीच्या पहिल्या टप्प्यांतील काम पूर्णत्वास जात आहे. शेतक-यांना चांगला काजुला दर मिळावा , यासाठी बॅंक व आम्ही एकत्रित पाठपुरावा केला होता. सध्या खासगी धान खरेदी होत असल्याने खरेदीमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. संघ आणि सोसायट्यांनीही धान खरेदीमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून बाजार समितीचे काम करत आहे. सिंधुदुर्ग हा शेतीप्रधान जिल्हा असून बँकेच्या सहकार्यामुळे बाजार समितीचे काम प्रत्यक्षात उभे राहत आहे. उपबाजार व मत्स्यबाजारासाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुळशीदास रावराणे यांच्या अभिनंदनाचा ठराव बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत विकास संस्था शेतकरी यांच्या हिताबाबत विविध मुद्दांवर चर्चा झाली. सुत्रसंचालन सहाय्यक सचिव संजय रावराणे तर आभार सचिन कुबल यांनी मानले.

शेअर करा